आस्ताद काळेची दुर्दैवी प्रेम कहाणी

Aastad Kale & Prachi Mate

स्पर्धकांमध्ये उडणारे सततचे खटके आणि वेगवेगळ्या इंटरेस्टिंग टास्कमुळे कलर्स मराठी वरील बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. याच कार्यक्रमात अँग्री यंग मॅन म्हणून ओळखला जाणारा आस्ताद काळे याने आपल्या गर्लफ्रेंडच्या आठवणी सांगत घरातल्या सर्व सदस्यांना भावुक केलं. घरातल्या रहिवाश्यांच्या मनोरंजनासाठी बिग बॉसनी खास 'थत्तेगिरी' हा टॉक-शो आयोजित करण्याचे आदेश अनिल थत्ते यांना दिले होते. या टॉक-शोच्या अंतर्गत अनिल थत्ते यांनी आस्तादची मुलाखत घेतली. याच मुलाखतीत आस्तादने त्याच्या गर्लफ्रेंडचे कर्करोगामुळे अकाली निधन झाल्याचे सांगत सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. खुद्द आस्तादचे डोळे देखील यावेळी पाणावले होते. कोण होती ही मुलगी? आस्ताद आणि तिची ओळख कशी झाली? ह्या सगळ्या प्रश्नांचा उलगडा केलाय मराठी बॉक्स ऑफिसने:

आस्तादच्या गर्लफ्रेंडचं नाव प्राची माटे असून 'नेव्हर माईंड ' या नाटकात आणि 'अग्निहोत्र ' या मालिकेत आस्ताद आणि प्राचीने एकत्र काम केलं होतं. मात्र, वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी बोनमॅरो कॅन्सरमुळे प्राचीचे निधन झाले. 'टाइम प्लीज ' चित्रपटामध्ये प्राचीने सई ताम्हणकरच्या बहिणीची भूमिका साकारली होती, पण दुर्दैवाने हा चित्रपट प्राचीच्या निधनानंतर प्रदर्शित झाला. तसेच चार दिवस सासूचे या मालिकेमध्ये देखील प्राची झळकली होती.

या दुःखातून बाहेर पडणं आस्तादला नक्कीच कठीण गेलं असणार आणि याचीच प्रचिती बिग बॉसचा एपिसोड बघताना आली. आस्ताद आता या प्रसंगातून थोडा सावरलेला दिसत असून बिगबॉसद्वारे प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar