बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचे साम्राज्य स्थापित

Marathifilms released on this Friday
 बॉलिवूड सिनेसृष्टी १००, २०० मग ३०० कोटी पर्यंत पोचली पण मराठी सिनेसृष्टी मागे राहिली, असा कांगावा करणार्‍या लोकांना सैराट चित्रपटाने सडेतोड उत्तर दिले. त्यासोबत आलेला "बागी" हा बॉलीवूड सिनेमा सैराटसमोर तग धरू शकला नाही. नुकताच दिवाळीच्या मुहूर्तावर आलेला "आणि डॉ काशिनाथ घाणेकर" या सिनेमान बॉलीवूडच्या "ठग्स ऑफ हिंदोस्थान" सारख्या चित्रपटाला मागे टाकले. या शुक्रवारी म्हणजेच १६ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील तिकीटबारीवर संपूर्णतः मराठी सिनेमाचे साम्राज्य दिसले.  
बॉक्सऑफिसवर आज, सैराटनंतर पहिल्यांदाच लिस्टिंगमध्ये सर्वत्र मराठी सिनेमांचे राज्य आहे. त्यातही ‘आणि..काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला दुसऱ्या आठवड्यात प्राईमटाईमला जास्त स्क्रीन्स मिळाल्या आहेत. हा सिनेमा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात मिळून ६००० शोजमध्ये सुरू आहे. अपेक्षेप्रमाणे बलाढ्य निर्मितीसंस्थेचा "नाळ" सुद्धा उत्तम स्क्रीनकाऊंटने सुरु झाला आहे. इतर सिनेमापैकी "एक सांगायचय" आणि "गॅटमॅट" हे मराठी सिनेमेसुद्धा बऱ्यापैकी शोज सांभाळून आहेत. हिंदीतील "बधाई हो" बर्‍यापैकी तग धरून आहे तर "ठग्स ऑफ व हिंदोस्तान" पूर्णता नष्ट झाला आहे. थोडक्यात सिनेमा लिस्टींगमध्ये या आठवड्यात पाच मराठी सिनेमे दिसत आहेत, तर हिंदी सिनेमांची संख्या कमी आहे. 


 
सोशल मीडियावरील नकारार्थी प्रतिक्रिया आणि समीक्षकांची नापसंती याचा परिणाम म्हणून "ठग्स ऑफ हिंदोस्तान" सिनेमा बॉक्स-ऑफिसवरून जवळपास नामशेष झाला आहे. तर मराठीत घाणेकर आणि नाळचे शुक्रवारचे शोज फटाफट हाऊसफुल झाले. त्यात "नाळ" नवीन रिलीज असल्यामुळे त्याचे शोज हाऊसफुल होण्याचा वेग जास्त आहे. इतर दोन मराठी चित्रपटांनाही संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. पुणे, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात "नाळ" हाउसफुल जात आहे तर मुंबईसारख्या शहरी भागात "आणि डॉ काशिनाथ घाणेकर" आणि "नाळ" हे दोन्ही सिनेमे गर्दी खेचत आहेत. वीकेंडला सुट्टीच्या दिवसात हे दोन सिनेमे बॉक्सऑफिसवर विक्रम रचतील असा अंदाज वर्तवला जात आहे. एकूणच, या आठवड्यात महाराष्ट्रातील तिकीट बारीवर संपूर्णता मराठी सिनेमांचे राज्य आहे, आणि खूप दिवसानंतर असा योग पाहायला मिळाल्यामुळे मराठी प्रेक्षक आणि निर्माते, दोन्ही आनंदात आहेत.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar