नॅशनल फिल्म म्युझियम मध्ये मराठीला स्वतंत्र आणि मानाचे स्थान मिळणार...

NMIC, MUMBAI
गेल्याच महिन्यात दक्षिण मुंबईतील फिल्म डिविजन मध्ये नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) सुरू झाले आहे. याच्या लाँच सोहळ्यावेळी पंतप्रधान 'नरेंद्र मोदी' तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यानंतर सामान्य लोकांसाठी संग्रहालयाचे दालन खुले करण्यात आले आणि तेथील वस्तूंचा संग्रह पाहण्यासाठी लोकांची गर्दी देखील होत आहे. भारतीय सिनेमांमध्ये महत्त्वाचे योगदान दिलेल्या अनेक व्यक्तींची नोंद या संग्रहालयात घेण्यात आली आहे परंतु मराठी सिनेमासाठी या संग्रहालयात स्वतंत्र व्यवस्था नाही, याबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 मुंबईसारख्या मराठी भागात संग्रहालयाची वास्तू असून येथील मराठी लोकांना स्वभाषिक सिनेमाबद्दल जास्त पाहायला मिळत नाही याची खंत व्यक्त होत आहे. त्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव लवकरच या संग्रहालयामध्ये मराठीसाठी स्वतंत्र आणि मानाचे स्थान देण्यात येणार आहे. मराठी सिनेमासृष्टीचा प्रवास लोकांसमोर यावा यासाठी संग्रहालयाच्या परिसरात काही विशिष्ट वास्तू बांधण्यात येणार आहेत, ज्यासाठी कलादिग्दर्शक 'नितीन देसाई' यांच्या सोबत बोलणी सुरु असल्याचे कळते. याबद्दल राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे मुख्य अधिकारी 'अनिल कुमार' म्हणाले की, "आपल्या या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या दालनांमध्ये काळानुरूप अनेक बदल करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मराठीसाठी स्वतंत्र दालनाची रचना करण्यात येणार आहे. मराठी सिनेसृष्टीचा अमूल्य ठेवा म्हणजेच मराठी सिनेमाशी निगडीत असलेल्या इतिहासातील वस्तू, चित्रपटांचे पोस्टर्स आणि निरनिराळ्या व्यक्तिरेखांचे पेहराव या गोष्टी लोकांना पाहता याव्यात यासाठी मराठी सिनेनिर्मात्यांनी फिल्म डिविजनला यांना सहकार्य करावे."

Read Next...


Popular News

Read something similar