मालिकेमुळे सुटलं पुस्तकावरचं 'ग्रहण'

Pallavi Joshi


प्रसिद्ध लेखक नारायण धारप हे आपल्या गूढ आणि भय कथांसाठी ओळखले जातात. आतापर्यंत त्यांची १००हुन अधिक पुस्तकं प्रकाशित झाली असून सध्या झी मराठीवर सुरु असलेली 'ग्रहण' ही मालिका त्यांच्याच ग्रहण या पुस्तकावर आधारित आहे. बऱ्याच कालावधीनंतर पल्लवी जोशी या मराठी टेलिव्हिजन वर पुनरागमन करणार असल्यामुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. पल्लवी जोशी यांचा सहज सुंदर अभिनय प्रेक्षकांना घाबरवू ही शकतो हे या मालिकेमुळे नव्यानेच  उलगडून आले. मात्र या मालिकेमुळे ग्रहण या पुस्तकाला चांगलाच फायदा झाल्याचं दिसून येत आहे कारण बाजारपेठेत या पुस्तकाची मागणी जोर धरत असल्याची चर्चा आहे. जेव्हा ग्रहण ही मालिका प्रसिद्ध झाली तेव्हा हे पुस्तक बाजारपेठेत उपलब्धच नव्हते. पण वाचकांच्या वाढत्या मागणीमुळे 'अक्षरधारा' या संस्थेने पुढाकार घेऊन हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि हे पुस्तक पुन्हा वाचकांसाठी उपलब्ध झाले. परंतु एखाद्या कादंबरीवर आधारित  मालिका येणं हे मराठीमध्ये काही नवीन नाही. झी मराठी या वाहिनीने याआधी 'पिंपळपान' या मालिकेद्वारे दिग्गज लेखकांचं साहित्य आपल्या भेटीस आणलं होतं. सुधा मूर्ती यांच्या 'महाश्वेता' कादंबरीवर आधारित 'महाश्वेता' ही मराठी मालिका सह्याद्री वाहिनीवर आली होती.  तसेच त्यांच्या 'पितृऋण' या कादंबरीवर आधारीत एक मराठी चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता, ज्यात सुधा मूर्ती यांनी एक छोटीशी भूमिका देखील साकारली होती. विजय तेंडुलकरांच्या 'कमला'  या कादंबरीवर आधारित 'कमला'  ही मालिका मध्यंतरी कलर्स मराठीवर येऊन गेली. नारायण धारप यांच्याच 'अनोळखी दिशा'  या पुस्तकावर आधारित 'अनोळखी दिशा'  ही मालिका महेश कोठारे यांनी स्टार प्रवाहवर प्रस्तुत केली होती. सतीश राजवाडे यांनी सुहास शिरवळकरांच्या 'दुनियादारी' आणि 'समांतर' या कादंबऱ्यांवर आधारित 'दुनियादारी'  आणि 'कशाला उद्याची बात'  या मालिका आपल्या भेटीस आणल्या होत्या. रत्नाकर मतकरी यांच्या 'गहिरे पाणी'  या कादंबरीवर आधारित मालिका झी मराठीवर आली होती आणि ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.मालिका किंवा चित्रपट एखाद्या कादंबरीवर आधारित असल्यास ती कादंबरी वाचण्याकडे सिनेरसिकांचा विशेष कल असतो आणि याचाच फायदा पुस्तक विक्रेत्यांना होतो. बऱ्याचदा मालिका रंजक करण्यासाठी मूळ लेखकाची गोष्ट वाढवून चढवून आपल्या समोर मांडण्यात येते. यावेळी मूळ लेखकाच्या गोष्टीला धक्का लागण्याची भीती तर असतेच पण त्याचबरोबर कुठेतरी वाचकांच्या भावना दुखावण्याची शक्यता देखील निर्माण होते. परंतु बऱ्याचवेळेला नाटक, सिनेमा आणि मालिकांच्या माध्यमातून मराठीतल्या अनेक दिग्गज लेखकांच्या विस्मरणात गेलेल्या साहित्यकृत्यांशी नव्याने ओळख होते. तसेच आताच्या नव्या पिढीला देखील मराठी साहित्य आणि लेखक यांच्याबद्दल कुतूहल निर्माण होण्यास मदत होते आणि याचाच प्रत्यय झी मराठीच्या 'ग्रहण' या मालिकेद्वारे आला. 

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar