वाढदिवस स्पेशल :- अंकुश चौधरीचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घ्या....

ANKUSH CHAUDHARI IN DIFFERENT FILMS OF HIS CAREER
१९९५ मध्ये "सुना येती घरा" मधून आपल्या करीअरची सुरुवात करणाऱ्या आणि आजच्या घडीला मराठी इंडस्ट्रीतील एक नावाजलेला सुपरस्टार असा यशस्वी प्रवास करणार्‍या 'अंकुश चौधरी' चा आज वाढदिवस आहे. त्याच्या आजपर्यंतच्या प्रवासात त्याने नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये तसेच कॉमेडी, थ्रिलर, ड्रामा अशा जवळपास सर्वच शैलीमध्ये आपल्या अभिनयाचा दर्जा दाखवला आहे. आणि या सर्वांमध्ये व्यावसायिक यश तसेच लोकप्रियता या दोन्ही बाबतीत 'अंकुश चौधरी' उजवा ठरला आहे.


 साल २००० मध्ये हिंदीतील "जिस देश मे गंगा रहता है" या सिनेमात गोविंदाच्या भावाची म्हणजेच 'माँटी' ही छोटीशी भूमिका त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात महत्त्वाची ठरली. यानंतर २००४ मध्ये "सावरखेड एक गाव" या मराठी सिनेमाने त्याला मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण करून दिले. २००६ या एकाच वर्षात तर त्याने "मातीच्या चुली", "यंदा कर्तव्य आहे", "आईशप्पथ" या तब्बल तीन सिनेमांची खैरात केली. त्याच्या पुढच्याच वर्षी दिग्दर्शनात पदार्पण करून रेकॉर्ड ब्रेकिंग "साडे माडे तीन" हा सिनेमा दिला. यानंतर "चेकमेट", "गैर", "रिंगा रिंगा", "लालबाग-परळ" या थ्रिलर सिनेमांमधून आपला अभिनय दाखवत प्रेक्षकांना घायाळ केले. याच काळात "उलाढाल" आणि "यांचा काही नेम नाही" या दोन कॉमेडीपटात देखील त्यांने काम केले, यातूनच त्याच्या कामातील वैविध्यता आपल्या लक्षात येते.


 २०११ मध्ये "शहाणपण देगा देवा" आणि "झकास" या दोन आणि २०१२ मध्ये "नो एन्ट्री पुढे धोका आहे" या यशस्वी आणि मॅड मॅड कॉमेडी सिनेमात देखील त्यांनी भन्नाट व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. २०१३ मधील रेकॉर्ड ब्रेकिंग "दुनियादारी" या सिनेमातील त्याचा 'डी...एस....पी' तर अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. २०१५ मध्ये "क्लासमेट्स", "डबल सीट", "दगडी चाळ" हे एकाच वर्षात तीन सुपरहिट सिनेमे देऊन त्याने एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला. "ती सध्या काय करते" (२०१७) या सिनेमातील त्याचा 'अनुराग देशपांडे' आणि त्याची निरागसता सर्व प्रेक्षकांना भावली होती. या दशकात तरी अंकुश चौधरीच्या यशाचा रथ अनस्टॉपेबल असाच राहिला आहे आणि तो यापुढेही थांबू नये ह्याच शुभेच्छा, आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आहेतच...

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar