मुळशी पॅटर्नचा होणार हिंदीत रिमेक. वाचा सविस्तर.

प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न हा सिनेमा तुफान चालला. मुळशी भागात शेतजमीन विकल्यावर शेतकऱ्यांची होणारी अवस्था आणि त्यामुळे उद्भवलेली गुन्हेगारी या चित्रपटातून मांडण्यात आली.  या सिनेमामधील आरारारार.. हे गाणंही गाजलं. ओम भूतकर, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, मोहन जोशी, सविता मालपेकर आदींच्या यात भूमिका होत्या. हा सिनेमा अनेक अमराठी कलाकारांनी देखील पाहिला.  त्यामधील अमराठी कलाकार म्हणजे अभिनेता सलमान खान. सलमान खानला हा सिनेमा खूप आवडला. पण आता मुळशी पॅटर्न हिंदीत करायचा त्याने ठरवलं आहे.   या सिनेमाचं नाव "गन्स ऑफ नॉर्थ" असं असणार आहे.  ओम भूतकरने साकारलेली भूमिका सलमान खानच्या बहिणीचा नवरा अभिनेता आयुष शर्मा साकारणार आहे.  

 

 

या सिनेमाचं नाव आधी धाक असं ठेवण्यात आलं होतं. पण आता ते बदलण्यात आलं. सिनेमाची सगळी तयारी पूर्ण झाली असून, एप्रिलमध्ये सिनेमाचं चित्रिकरण सुरू होणार होतं. पण, लॉकडाऊनमुळे हा बेत रद्द करावा लागला. आता लॉकडाऊन उठल्यानंतर या सिनेमाच्या चित्रिकरणाला वेग येणार आहे. आयुष शर्माने यापूर्वी लव्हयात्री हा सिनेमा केला होता. वारिना खान ही नायिका त्याच्यासोबत होती. लव्हयात्री तिकीटबारीवर फार काही करू शकला नाही. या चित्रपटाने आयुषला हातही दिला नाही. म्हणूनच सलमान खानने आपल्या आयुषसाठी मुळशी पॅटर्नची निवड केली आहे. आता त्याला आयुष किती न्याय देतो ते पाहावं लागेल.

 

या सिनेमात सलमान खानही असणार आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार उपेंद्र लिमये यांनी साकारलेला पोलीस सलमान साकारण्याची शक्यता आहे. तर प्रवीण तरडे यांनी साकारलेला डॉन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  मुळशी पॅटर्नने महाराष्टात मिळवलेलं यश पाहता या सिनेमाकडून मराठी जनांना अनेक अपेक्षा आहेत. विशेष बाब म्हणजे प्रवीण तरडेही या सिनेमाच्या जडणघडणीमध्ये महत्वाच्या जबाबदारीवर असणार आहेत. पण ते नेमकी कोणती जबाबदारी स्वीकारतायत ते जाहीर करण्यात आलेलं नाही.  प्रेक्षकांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Tags

Read Next...


Featured News

Read something similar