'स्पृहा जोशी'च्या लॉकडाऊनमधील 'खजिना' लाईव्ह सीरिजला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

Spruha Joshi

अभिनेत्री स्पृहा जोशीने लॉकडाऊनमध्ये खजिना ही सेलिब्रिटी गप्पा आणि कवितांच्या इन्स्टा लाइव सेशनची एक श्रवणीय मालिका केली. 15 भागांच्या ‘खजिना आठवणीतल्या, साठवणीतल्या कविता,पुस्तकं आणि बरचं काही..’ इन्स्टालाइव सेशन्सना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

 

 

लॉकडाउन सुरू झाल्यावर ‘हॅशटॅग ग्रॅटिट्युड डायरी’ नावाने सोशल मीडियावर स्पृहा जोशी आपल्या जवळच्या व्यक्तिंविषयीचे फोटो आणि पोस्ट टाकत होती. 21 दिवसांच्या पहिल्या लॉकडाउननंतर ही ग्रॅटिट्युड डायरी संपली आणि खजिना सीरिज सुरू झाली. ह्या इन्स्टा सीरिजव्दारे स्वानंद किरकिरे, सुबोध भावे, अवधुत गुप्ते, अनिता दाते, जीतेंद्र जोशी, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, महेश काळे, वैभव जोशी, संदीप खरे, अमेय वाघ, संकर्षण क-हाडे, शाल्मली खोलगडे, सिध्दार्थ मिश्रा अशा 14 सेलिब्रिटींच्यासोबत स्पृहा जोशीच्या अमिट कविता, साहित्यावरची लाइव सेशन्सची मेजवानी रसिकांना पाहायला मिळाली.

 

अभिनेत्री स्पृहा जोशी खजिनाविषयी सांगते, “वाचनाचा छंद असल्याने लॉकडाऊन सुरू झाल्यावर मी वाचन सुरू केलं. मग त्यावेळी उत्सुकता चाळवली की, आपले सेलिब्रिटी मित्र ह्या लॉकडाऊनच्या काळात सध्या काय वाचन करत असतील, त्यांची आवडती कविता, पुस्तक कोणती? हे जाणून घेण्यासाठी खजिनाची संकल्पना सुचली. ह्या गप्पा निश्चितच प्रेक्षकांनाही मनोरंजक आणि माहितीपर ठरतील. लाइव सेशन्स केली तर प्रेक्षकांचाही त्यात सहभाग असेल, असं वाटल्याने खजिनाची इन्स्टा लाइव सेशन्स सुरू केली. ही सेशन्स सुरू झाल्यावर लक्षात आलं की, ह्या प्रत्येक कलाकाराकडे आपल्या सिनेसृष्टीतल्या कामाचा, अनुभवाचा आणि वाचनाचा एवढा खजिना आहे, की त्यामूळे ह्या सीरिजचे नावही कुठेतरी सार्थक झाल्याचे समाधान वाटले.”

 

दुपारच्या वेळी ही सीरिज असूनही प्रत्येक लाइव सेशनला मिळणारा रसिकांचा भरभरून प्रतिसाद पाहून स्पृहा जोशीला हुरूप आला. बा.भ बोरकरांपासून ते शांता शेळके आणि कवी ग्रेस ह्यांपर्यंत अनेक कवींच्या कवितांची फर्माइश रसिकांनी केली. ह्या लाइव सेशन्समधल्या सेलिब्रिटींनीही एवढ्या अप्रतिम कवितांनी सेशन्स आठवणीतली केली, की, त्यामूळे 15 भागांनंतर ही रंगलेली सीरिज संपल्याने अनेक रसिकांचा हिरमोड झाला. ह्याविषयी विचारल्यावर स्पृहा सांगते,” प्रत्येक सेशननंतर रसिकांचा मिळणारा प्रतिसाद हे दरवेळी माझा उत्साह वाढवणारे होते. म्हणूनच तर 14 भाग सेलिब्रिटींसोबत केल्यावर रसिकांसोबत केलेला शेवटचा भागही उत्तम रंगला. अनेकांनी खजिना संपल्यावर नाराजी व्यक्त केली. पण मला असं वाटतं की, प्रत्येक गोष्टीची थोडक्यात गोडी असते. कधी संपवणार ह्या प्रश्नापेक्षा का संपवलं हा प्रश्न सुखद असतो. सध्यापुरतं हा स्वल्पविमार आहे, असं म्हणूया. आता नवीन संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीला यायचा विचार आहे.“

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar